१५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवस
१५ ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वतंत्रता दिवस. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विळख्यातून स्वतंत्र झाला. त्यामुळेच हा दिवस आपण सर्वच जण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. आपल्या भारतात हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. यादिवशी शाळा, महाविद्यालये, संस्था, ऐतिहासिक ठिकाणे तसेच काही सार्वजनिक ठिकाणी सुद्धा ध्वजारोहण आणि ध्वजवंदन मोठ्या आदराने, आपुलकीने साजरे करतात. १५ ऑगस्ट दिवशी लाल किल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ध्वजारोहणानंतर लाल किल्यावर प्रधानमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांसारख्या थोर नेत्यांना आणि शूरवीरांना श्रद्धांजली वाहतात. स्वातंत्र्यापूर्वी भारतीयांनी १५० वर्ष अनंत यातना,अत्याचार सहन केले. त्याविरुद्ध मोठमोठ्या देशभक्तांनी बंड केले, चळवळी केल्या,सत्याग्रह केले. १९४७ साली स्वातंत्रोत्तर चळवळीत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान केले,कित्येकांना फाशीची शिक्षा दिली गेली तर कित्येकांना तुरुंगवासही भोगावा लागला. या सगळ्यांच्या त्यागामुळे आपला देश स्वतंत्र झाला.स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू १९४७ साली भारताचे पहिले पंतप्रधान झाले.आपल्या देशाच्या झेंड्यामध्ये तीन रंग आहेत म्हणूनच याला तिरंगा म्हणले जाते,हा आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो.यातील पहिला रंग केशरी हा धैर्य आणि त्याग दर्शवतो,पांढरा रंग शांतीचे प्रतीक आणि हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक दर्शवतो,त्यामधील निळ्या रंगाचे अशोकचक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे. १५ ऑगस्टला आम्ही गणवेशात शाळेत जातो. मुख्याद्यापकांच्या हातून झेंडावंदन होते आणि राष्ट्रगीत गायले जाते.मग आम्ही देशभक्तिवर निरनिराळे कार्यक्रम सादर करतो.शाळेकडून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला जातो.असा हा दिवस मी कायम स्मरणात ठेवतो. स्वातंत्र्यदिनी सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. सर्वच ठिकाणी आपला तिरंगा फडकवत एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.ठिकठिकाणी निरनिराळे कार्यक्रम सादर केले जातात.देशभक्तीपर गाणे,नृत्य ,भाषण किंवा अभिनय करून इतिहासाला उजाळा दिला जातो. आमच्या सोसायटी मध्ये सुद्धा खूप उत्साहाने स्वत्रंत्रदिन साजरा केला जातो. सगळेजण राष्ट्रध्वजाचे बिल्ले छातीवर लावतात. असा हा स्वातंत्र्यदिवस सगळेजण अभिमानाने साजरा करतात.
time: 0.0153219700