आई हे संपूर्ण जगातील थोर दैवत आहे. प्रभू रामचंद्रांना त्यांच्या आईने घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातेनेच मोठे केले. जगातील सर्व थोर माणसांवर त्यांच्या आईनेच संस्कार केले, म्हणून आईपेक्षा मोठे या जगात कोणीही नाही.
आपला जन्म होतो, तेव्हा आपण फक्त एक गोळा असतो. आपल्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, आपल्याला काहीच करता येत नाही. त्या काळात आईच आपली काळजी घेते. आईच आपल्याला लहानाचे मोठे करते, आपल्यावर चांगले संस्कार करते. आपण शिकून मोठे व्हावे याकरता ती अहोरात्र धडपडते. आपल्यामध्ये जे-जे चांगले आहे, ते-ते आईमुळेच मिळालेले असते. म्हणूनच सर्वजण म्हणतात, "आई, थोर तुझे उपकार !"
माझ्या आईचे नाव शारदा आहे . ती खूप प्रेमळ आहे . ती नेहमी हसतमुख असते .माझी आई रोज सकाळी पाच वाजता उठते , आमचे शाळेत न्यायचे खाऊचे डबे तयार करते . मग आम्हाला शाळेत जायच्या तयारीत मदत करते . आम्हाला न्याहारी करून शाळेत पाठवते . माझी आई खूप छान स्वयंपाक करते .
माझी आई शाळेत शिकवते . त्यामुळे तिच्याकडे जास्त वेळ नसतो . तरीही ती माझ्यासाठी रोज
संध्याकाळी थोडा वेळ काढते , तेव्हा आम्ही खूप बोलतो व वेगवेगळे खेळ खेळतो . माझ्यासारखी
तिलाही उन्हाळ्यात सुट्टी असते त्यामुळे तेव्हा आई मला पूर्ण वेळ देते . तसे तिला उत्तरपत्रिका
तपासण्याचे काम असते , पण बाकी वेळेत ती मला खूप गोष्टी सांगते , फिरायला घेऊन जाते . मी
चुकीचं वागल्यावर ती मला रागावतेही , पण नंतर प्रेमाने जवळ घेते . मी आजारी पडले की ती
माझ्या शेजारी बसून राहते व माझी खूप काळजी घेते .
माझी आई माझा अभ्यास घेते , मला चांगल्या सवयी समजून सांगते . ती खूप सोप्या भाषेत , गोडीने
शिकवते ज्यामुळे मला उत्तम गुण मिळतात . माझी आई घरातील सर्वांची काळजी घेते . ती स्वतः
आनंदी राहते आणि आम्हा सर्वांना आनंद देते, म्हणून माझी आई मला खूप खूप आवडते . 'स्वामी
तिन्ही जगाचा आईविना भिकारी'; मानतात ते अगदी खरे आहे .