“वृक्षवल्ली आम्हा सोयरी” म्हणजे झाड आपली मित्र. हो खरच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वच्या संधर्भात महत्वाची भूमिका बजावीत आहे. मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या सर्व गोष्टी अगदी निरपेक्ष हेतूने वृक्ष देतात. वृक्षांपासून आपणास अन्नधान्यापासून ते घरसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू सर्व काही मिळते. सर्व सजीवांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजें ऑक्सीजन. ऑक्सीजन श्वास घेऊन आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. हाच कार्बन डायऑक्साइड वृक्ष शोषून घेतात व आपणाला आवश्यक असणारा ऑक्सिजन ते सोडतात. तसेच वृक्षांपासून आपणास अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधी, इंधन, इमारती लाकूड आदी प्राप्त होते. भूमी आणि जलसंरक्षणाचे काम वृक्ष करतात. पाण्याचा दुष्काळ, पूर नियंत्रण, जमिनींची धूप या गोष्टी रोखण्यासाठी वृक्षच मदत करतात. जमिनींचा ओलसरपणा टिकून राहण्यासाठी वृक्षांचा उपयोग होतो. हिमालयाच्या पर्वतीय भागात देवदार, बांबू, साल, साग इत्यादी वृक्ष आढळतात. अशा वृक्षांपासून आपल्याला इमारती, जहाजे इ. साठी लाकूड मिळते तसेच निसर्गाचा समतोलही राखला जातो.
औषधे तयार करण्यासाठी वृक्षांची फुले, फळे, साल, पाने, मुळे, बिया या सर्वांचा उपयोग केला जातो. स्वादिष्ट फळे, सुगंधित फुले, वस्त्र, इंधन, घर यासाठी मानव आजही वृक्षांवरच अवलंबून आहे. वृक्ष व पशूपक्षी हे परस्पर पर्यायी आहेत. जिथे वृक्षांची हिरवीगार वनराई असते तेथेच पक्ष्यांचा किलबिलाट असतो. फक्त मनुष्याला नाही तर अनेक वन्य जीवांकरता पण वृक्ष फार महत्वाच काम करते. अनेक पक्षी, छोटे-छोटे जीव-जंतु आपलं निवास स्थान झाडातच करतात. पक्षी वृक्षांवर घरटे बनवितात. जर झाड नाही, जंगल नाही तर जंगली जनावर गावांत, शहरात घुसतील व मानव वस्तीत हानि पोहचवतील. दैनिक कामकाजातील थकवा, मनाचा शीण घालवण्यासाठी पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते, तेव्हा निसर्गाच्या सानिध्यातील तो आनंद काही औरच असतो. हिरव्यागार घनदाट वृक्षांनी आच्छादलेली पर्वतरांग नेत्रसुखाचा अवर्णनीय आनंद देऊन जाते.
वृक्ष आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याबरोबरच कार्बन डायऑक्साइड सारखे विषारी वायू शोषून घेऊन आपणास प्राणवायू देतात. दुहेरी भूमिका पार पडणाऱ्या या वृक्षामध्ये प्रदूषण कमी करण्याची अद्भुत क्षमता असते. वातावरण सुरक्षित, थंड, सुगंधित करण्यासाठी वृक्षांची सधनता उपयोगी ठरते.
वृक्षांचे तीन प्रकारांत वर्गीकरण करता येते - फुलझाडे, सावली देणारे वृक्ष, फळझाडे या सर्व प्रकारच्या वृक्षांचा एकाच उद्देश आहे, मानवाचे कल्याण करणे. वृक्ष आपल्या सभोवतालचा परिसर सुंदर करतातच पण वातावरणही सुगंधित करतात. त्यामुळे शांती आणि आनंद वाटतो. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून आपल्याला सावली देतात. वनांपासून आपल्याला डिंक, लाख, कागद, रबर या नित्योपयोगी वस्तू मिळतात.
पण काळ बदलला. माणसांतील माणुसकी हरवली. माणसे स्वार्थी बनू लागली. उंच इमारती बांधण्यासाठी त्यांनी झाडे तोडण्यास सुरुवात केली. रहदारी वाढली, मोठ्या रस्त्यांची निकड निर्माण झाली, तेव्हा जूने जूने वृक्षही तोडण्यात आले. इंधनासाठी झाडाची तोड सुरु झाली. जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत आणि यामुळे गंभीर परिणाम दिसायला लागले आहेत. औषधीयुक्त वनस्पति मिळण ही दुर्मिळ झाली आहे. झाड नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. या मुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे. हे थांबवण्याकरिता नागरीकांत वृक्ष तोडीचे भयानक परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे. आज मानव झाडे तोडत राहतो पण तीच झाडे पुन्हा लावत नाही. हिरवीगार जंगले त्याने उजाड करून टाकली आणि त्यामुळे पर्यावरणाची भयंकर समस्या आपल्यासमोर उभी राहिली. आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभे असणारे वृक्ष आपले जीवनदाते आहेत म्हणून आपण जुन्या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त वृक्ष दरवर्षी लावले पाहिजेत, त्यामुळे दुष्काळ आणि वाळवंटीकरणासारख्या समस्या नष्ट होऊ शकतील.