वर्ण विचार वाक्य :- पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे 'वाक्य' होय. उदा. सुरेश अभ्यास करतो. शब्द :- ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाल्यास त्याला 'शब्द' असे म्हणतात. उदा. अभ्यास ( वाक्यात शब्दांना पद असे म्हणतात. ) अक्षर :- सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजन यांना 'अक्षर' असे म्हणतात. ध्वनीच्या / आवाजाच्या खुणेला 'अक्षर' म्हणतात. त्यांना 'ध्वनिचिन्हे' असेही म्हणतात. उदा. अ, भ्या, स वर्ण :- हे ध्वनिचिन्हे आहेत पण मूलध्वनी नाहीत. मूलध्वनी : अ् + अ, भ् + य् + आ, स् + अ आपल्या तोंडाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना ' वर्ण ' असे म्हणतात. ध्वनी नष्ट होऊ नये म्हणून रंगाने/वर्णाने लिहितो. म्हणून त्यांना 'वर्ण' असे म्हणतात. मराठीत एकूण ४८ वर्ण आहेत.या वर्णाच्या मालीकेलाच 'वर्णमाला' किंवा 'मुळाक्षरे' असे म्हणतात. वर्णाचे प्रकार :- वर्णात एकूण ३ प्रकार असतात. १) स्वर २) स्वरादी ३) व्यंजने आपण वर्णाचे प्रकार सविस्तरपणे पाहूया. १) स्वर :- वर्णमालेतील अ पासून औ पर्यंत १२ वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करताना मुखातील कोणत्याही अवयवाचा स्पर्श न होता सहज जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना 'स्वर' असे म्हणतात. स्वरांचा उच्चार सहज व स्वतंत्र्यपणे होतो. दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साहाय्यावाचून होतो. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर हे पूर्ण उच्चारांचे वर्ण आहेत. अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए ऐ ओ औ वरील स्वरांचे असे प्रकार पडतात. क) ह्रस्व स्वर ख) दीर्घ स्वर ग) संयुक्त स्वर घ) सजातीय स्वर ड) विजातीय स्वर क) ह्रस्व स्वर :- ज्या स्वरांचा उच्चार करताना आखूड व कमी वेळ लागतो, त्या स्वरास 'ह्रस्व स्वर' असे म्हणतात. उदा. अ, इ, उ, ऋ ख) दीर्घ स्वर :- ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो, त्या स्वरास 'दीर्घ स्वर' असे म्हणतात. उदा. आ, ई, ऊ, ओ ग) संयुक्त स्वर :- दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना 'संयुक्त स्वर' असे म्हणतात. दोन विजातीय स्वर मिळून एक संयुक्त स्वर तयार होतो. ए - अ + इ/ई ऐ - आ + इ/ई ओ - अ + उ/ऊ औ - आ + उ/ऊ घ) सजातीय स्वर :- एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना 'सजातीय स्वर' असे म्हणतात. उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ ड) विजातीय स्वर :- भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना 'विजातीय स्वर' असे म्हणतात. उदा. अ-इ, आ-उ, अ-उ, आ-ई २) स्वरादी :- याच्यामध्ये अनुस्वार व विसर्ग असे दोन उच्चार आहेत. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना यांच्या अगोदर स्वर येतो म्हणून यांना 'स्वरादी' म्हणतात. स्वरादी म्हणजे 'स्वर' , आदी म्हणजे 'आरंभी' ज्याच्या असे वर्ण. स्वर + आदी - स्वरादी स्वरादीचे एकूण ३ प्रकार पडतात. क) अनुस्वार ( अं ) ख) अनुनासिक ग) विसर्ग ( : ) क) अनुस्वार - स्पष्ट व खणखणीत उच्चार याला अनुस्वार म्हणतात. स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. उदा. आंबा, चंचल ख) अनुनासिक - ओझरत्या आणि अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात. उदा. घरांत, जठरांतील ग) विसर्ग - श्वास सोडणे याचा अर्थ विसर्ग. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंब देतात. अनुस्वार व विसर्ग यांची उच्चारस्थाने देता येत नाही कारण त्याचा उच्चार वर्णानुसार बदलतो. उदा. स्वतः , दुःख ३) व्यंजन :- मराठीत एकूण ३४ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. व्यंजनांचा उच्चार अपूर्ण होतो हे दाखवण्यासाठी त्यांना पाय मोडून लिहितात. उदा. अ्, भ्, य् व्यंजनाचे प्रकार :- क) स्पर्श व्यंजने ख) अनुनासिक/परसवर्ण ग) कठोर/श्वास/अघोष व मृदू/नाद/घोष व्यंजने घ) अर्धस्वर/अंतस्थ ड) कंपित वर्ण च) उष्मे/घर्षक छ) महाप्राण व अल्पप्राण ज) स्वतंत्र वर्ण क) स्पर्श व्यंजने :- ज्या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा बाहेर पडतांना जीभ, कंठ, तालू, मुर्धा, दात, ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होऊन उच्चारले जातात म्हणून त्यांना 'स्पर्श व्यंजने' असे म्हणतात. क् ख् ग् घ् ड् च् छ् ज् झ् ञ् ट् ठ् ड् ढ् ण् त् थ् द् ध् न् प् फ् ब् भ् म् ख) अनुनासिक/परसवर्ण (५) :- ज्या वर्णाचा उच्चार त्या-त्या वर्णाच्या उच्चारस्थानाबरोबर नासिकेतून होते, त्यांना 'अनुनासिक व्यंजन' असे म्हणतात. उदा. ड् , ञ् , ण् , न् , म् अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरतात, म्हणून त्यांना 'परसवर्ण' म्हणतात. अनुस्वार असलेल्या वर्णाच्या पुढील अक्षर स्पर्श व्यंजन असेल तरच अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरतात, नसल्यास अनुनासिक वापरता येत नाही. उदा. घंटा- घन्टा य् , र् , ल् , व् , स् , श् , ष् , ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल अनुनासिक न वापरता फक्त शिर्षबिंदू द्यावे. उदा, सिंह ग) कठोर/श्वास/अघोष व मृदू/नाद/घोष व्यंजने :-
कठोर व्यंजने (१३) - ज्या वर्णाचा उच्चार करताना जोर द्यावा लागतो किंवा जेथे उच्चाराची तीव्रता दिसून येते, त्यांना 'कठोर व्यंजने' असे म्हणतात.
क् ख् च् छ् ट् ठ् त् थ् प् फ् श् ष् स् मृदू व्यंजने - ज्या वर्णाचा उच्चार कोमल, सौम्य किंवा मृदू होतो, त्यांना 'मृदू व्यंजने' असे म्हणतात. वर्ग | कठोर व्यंजने | मृदू व्यंजने | अनुनासिक/परसवर्ण |
क | क् ख् | ग् घ् | ड् |
च | च् छ् | ज् झ् | ञ् |
ट | ट् ठ् | ड् ढ् | ण् |
त | त् थ् | द् ध् | न् |
प | प् फ् | ब् भ् | म् |
घ) अर्धस्वर/अंतस्थ :- य् , र् , ल् , व् यांचा उच्चार अनुक्रमे इ, ऋ, लृ, ऊ या स्वरांच्या उच्चारासारखाच होतो म्हणून त्यांना 'अर्धस्वर' म्हणतात.
संधी होताना वरील स्वरांच्या जागी व्यंजन व व्यंजनाच्या जागी स्वर येतात.
सु + आनंद = उ + आ = व् + आ = स्वानंद
प्रिती + अर्थ = इ + अ + य् + अ = प्रीत्यर्थ
ड) कंपित वर्ण :- 'र्' या वर्णाचा उच्चार होताना मुखामध्ये कंपने निर्माण होतात म्हणून त्याला 'कंपीतवर्ण' म्हणतात.
च) उष्मे/घर्षक :- या व्यंजनाचा उच्चार करतांना मुखामध्ये घर्षण होते व उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना 'उष्मे/घर्षक वर्ण' असे म्हणतात. उदा. स् , श् , ष्
छ) महाप्राण व अल्पप्राण :- 'ह्' या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने फेकली जाते म्हणून त्याला 'महाप्राण' असे म्हणतात. 'ह' व 'ह्' युक्त वर्णांना महाप्राण म्हणतात, उरलेल्यांना 'अल्पप्राण' असे म्हणतात. अल्पप्राण | महाप्राण |
क् | क् + ह् = ख् |
ग् | ग् + ह् = घ् |
च् | च् + ह् = छ् |
ज् | ज् + ह् = झ् |
ट् | ट् + ह् = ठ् |
ड् | ड् + ह् = ड् |
त् | त् + ह् = थ् |
द् | द् + ह् = ध् |
प् | प् + ह् = फ् |
ब् | ब् + ह् = भ् |
वरील १० वर्ण व स् , श् , ष् , ह् असे एकूण १४ महाप्राण.
अल्पप्राण :- क् , ग् , ड् , च् , ज् , ञ् , ट् , ड् , ण् , त् , द् , न् , प् , ब् , म् , य् , र् , ल् , व् , ळ् - ही एकूण २० व्यंजने अल्पप्राण आहेत.
ज) स्वतंत्र वर्ण :- 'ळ' हा व्यंजन स्वतंत्र मानला जातो. कारण तो इतर भाषेत घेतलेला नाही, तो संस्कृतमध्ये किंवा हिंदीमध्ये आढळत नाही तर वैदिक वाङ्मयात आहे.