वाक्प्रचार (Phrases)


वाक्प्रचार :-

काही शब्दसमूहांचा भाषेत वापर करताना त्यांचा नेहमीचा अर्थ न राहता, त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार म्हणतात.

वाक्प्रचार म्हणजे विशिष्ट शब्दसमूहांचा मूळ अर्थ ( वाच्यार्थ ) न राहता रूढीने प्रचलित असणारा वेगळा अर्थबन्ध होय.

वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यांत उपयोग :-

" अ " पासून सुरु होणारे वाक्प्रचार
 
अवगत असणे - माहित असणे.
वाक्य - आदिवासी स्त्रियांना टोपली विकण्याची कला अवगत असते.

अवगत होणे - माहित होणे, कळणे, आकलन होणे.
वाक्य - चार दिवसांच्या अभ्यासाने कॉम्पुटर कसा चालवावा, याची कला राजूला अवगत झाली.

अवगत करणे - माहित करून घेणे.
वाक्य - सायलीने संस्कृत भाषा चांगलीच अवगत केली आहे.

अवहेलना करणे - अपमान करणे, अनादर करणे.
वाक्य - गुणवान माणसाची अवहेलना करू नये.

अमर होणे - चिरकाल नाव राहणे.
वाक्य - जे देशासाठी लढून मृत्यू पावले, ते वीर अमर झाले.

अहोरात्र झटणे - रात्रंदिवस कष्ट करणे.
वाक्य - मातीतून सोने पिकवण्यासाठी शेतकरी अहोरात्र झटत असतो.

अचूक वेध घेणे - न चुकता नेम साधणे.
वाक्य - नेमबाज सुकूर राजाने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

अवलंब करणे - अंगीकारणे, स्वीकारणे.
वाक्य - गुरुजींनी दिलेल्या अभ्यासाच्या वेळापत्रकाचा सईने अवलंब केला.

अजरामर होणे - कायम स्मरणात राहणे.
वाक्य - ज्या वीरांनी देशासाठी प्राणार्पण केले, ते अजरामर झाले.

अपशकुन मानणे - प्रतिकूल घडण्याचा संकेत मिळणे, वाईट शंका येणे.
वाक्य - आताच्या विज्ञाननिष्ठ जगात ' अपशकुन मानणे ' ही अंधश्रद्धा जोपासणे चुकीचे आहे.

अद्दल घडणे - शिक्षा करणे.
वाक्य - गजांआड टाकून पोलिसांनी चोरांना चांगलीच अद्दल घडवली.

अचंबा वाटणे - नवल वाटणे, आश्चर्य वाटणे.
वाक्य - चार वर्षाच्या राणीला सहजपणे संगणक चालवताना पाहून सर्वांनाच अचंबा वाटला.

अपूर्व योग येणे - दुर्मीळ योग येणे.
वाक्य - सूर्यग्रहण व चंद्रगहण एकाच दिवशी होण्याचा अपूर्व योग आला.

अमलात आणणे - कारवाई करणे.
वाक्य - माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय अमलात आणला.

अप्रूप वाटणे - आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.
वाक्य - लहानगी स्नेहा जेव्हा मधुर गीत गाते, तेव्हा श्रोत्यांना तिचे अप्रूप वाटते.

अवाक होणे - आश्चर्यचकित होणे.
वाक्य - अचानक उमटलेले इंद्रधनुष्य पाहून पूर्वा अवाक झाली.

अभिनंदन करणे - कौतुक करणे.
वाक्य - दहावीच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या समीरचे गुरुजींनी अभिनंदन केले.

अभंग असणे - एकसंध, अखंड असणे.
वाक्य - कितीही संकटे आली तरी भारतीयांची एकात्मता अभंग राहील.

अढी नसणे - मनात डंख न ठेवणे, मनात किल्मिष न ठेवणे.
वाक्य - स्पष्ट बोलणे झाल्यामुळे राजारामांच्या मनात मनोहरबद्दल कोणतीही अढी नव्हती.

अवसान गोळा करणे - धीर गोळा करणे.
वाक्य - शेवटी अवसान गोळा करून विकासने सरांसमोर आपला गुन्हा कबूल केला.

अशुभाची सावली पडणे - अमंगल घडणे, विपरीत घडणे.
वाक्य - लग्नानंतर चार महिन्यात विधवा झालेल्या राजश्रीवर जणू अशुभाची सावली पडली.

अलगद उचलणे - सावकाश उचलणे.
वाक्य - राजाने आपले पुस्तक अलगद उचलले.

असंतोष निर्माण होणे - चीड येणे, एखाद्या गोष्टीबद्दल खूप नाराजी निर्माण होणे.
वाक्य - इंग्रजी राजवटीविरोधी भारतीय लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

अधीर होणे - उत्सुक होणे.
वाक्य - मामाने नवीन आणलेल्या खेळणीशी खेळण्यासाठी सुमनचे मन अधीर झाले होते.

अबाधित ठेवणे - बंधन न घालणे.
वाक्य - वडिलांच्या निधनानंतर बाळूने शेतावरच हक्क अबाधित ठेवला.

अन्नान दशा होणे - उपासमारीची पाळी येणे.
वाक्य - महापुरामुळे शेकडो खेडेगावांतील लोकांची अन्नान दशा झाली आहे.

अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.
वाक्य - आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची अभिलाषा धरणे चांगले नाही.

अटक करणे - कैद करणे.
वाक्य - खूप प्रयासाने पोलिसांनी अखेर अट्टल चोरांना अटक केली.

अर्ध्या वचनात राहणे - आज्ञेत राहणे.
वाक्य - आजच्या काळात, स्त्रीने पुरुषाच्या अर्ध्या वचनात राहावे, ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.

अभिप्राय देणे - मत देणे, प्रतिक्रिया करणे.
वाक्य - राजूने लिहिलेले पत्रलेखन चांगले आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

अर्धचंद्र मिळणे - हकालपट्टी होणे.
वाक्य - भ्रष्टाचार करणाऱ्यांना ताबडतोब अर्धचंद्र मिळाला पाहिजे.

" उ " पासून सुरु होणारे वाक्प्रचार 

उगम होणे - सुरुवात होणे.
वाक्य - त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो.

उधळून टाकणे - विखरून टाकणे.
वाक्य - खोडकर वासराने धान्याची रास उधळून लावली.

उत्कट प्रेम असणे - खूप गाढ प्रेम असणे.
वाक्य - माझे माझ्या देशावर उत्कट प्रेम आहे.

उरी फुटून मरणे - अतिश्रमाने मरण येणे.
वाक्य - पावसाच्या अभावी अन्न पिकवण्यासाठी शेतकरी उरी फुटून मरत आहेत.

उघड्यावर टाकणे - निराधार करणे, जबाबदारी झटकणे.
वाक्य - कर्मचाऱ्यांनी संप करून, रास्ता दुरुस्तीचे काम उघड्यावर टाकले.

उदरनिर्वाह करणे - पोट भरणे, उपजीविका करणे.
वाक्य - दिवसभर शेतावर काम करून शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात.

उजळ माथ्याने फिरणे - उघडपणे वावरणे.
वाक्य - अनेक गुंड जामिनावर सुटून येतात आणि उजळ माथ्याने फिरतात.

उड्डाण करणे - झेप घेणे.
वाक्य - कामानिमित्त परदेशी जाण्याऱ्या रवीच्या विमानाने अखेर उड्डाण घेतले.

उपकार फेडणे - उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.
वाक्य - ज्यांनी आपणांस मदत केली, त्यांचे उपकार फेडावेत.

उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे.
वाक्य - अक्षयला मन लावून अभ्यास करण्यासाठी गुरुजींनी भरपूर प्रोत्साहन दिले.

उन्माद होणे - गुर्मी चढणे.
वाक्य - लॉटरीत २० लाखांचे बक्षीस मिळताच धोंडिबाच्या वागण्यात उन्माद आला.

उंबरठा ओलांडणे - मर्यादा सोडणे.
वाक्य - आईला वाटेल तसे बोलून कार्तिकने उंबरठा ओलांडला.

उंडारने - बागडणे, हुंदडणे.
वाक्य - अभ्यास सोडून गावभर उंडारने बरोबर नाही, हे आई सोम्याला समजावून सांगत होती.

" क " पासून सुरु होणारे वाक्प्रचार 

कणीक तिंबणे - मार देणे.
वाक्य - पोलिसांनी एका गुन्हेगाराची कणीक तिंबून गुन्ह्याची कबुली करून घेतली.

कळस होणे - चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा अतिरेक होणे.
वाक्य - कोणत्याही गोष्टीचा कळस होणे, हे चांगले नव्हे.

कळीचा नारद - भांडणे लावणारा.
वाक्य - दोन घनिष्ट मित्रांमध्ये भांडण लावणाऱ्या राजूला, कळीचा नारद म्हणणे चुकीचे नव्हे.

कपाळाला आठ्या पडणे - नाराजी दिसणे.
वाक्य - रोहिणीचे प्रगतीपत्र पाहून वडिलांच्या कपाळावर आठ्या पडल्या.

कच्छपी लागणे - एखाद्याच्या नादी लागणे.
वाक्य - मूर्ख माणसाच्या कच्छपी लागू नये.

कणव येणे - दया येणे.
वाक्य - रस्त्यावर पावसात भिजणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला पाहून राहुलला त्याच्यावर कणव आली.

कवडीही हातास न लागणे - एका पैशाचीही प्राप्ती न होणे.
वाक्य - करोनाच्या महामारीमुळे, धंदा बंद असल्या कारणाने रामूला कवडीही हातास नाही लागली.

कान देणे - लक्षपूर्वक ऐकणे
वाक्य - आजीने सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली.

काळ पालटणे - रूप पालटणे.
वाक्य - परिस्तिथी बदलली की आपली माणसे सुद्धा काळ पलटतात.

कालवा करणे - गोंधळ करणे.
वाक्य - लग्नात इंदूचा हार चोरी झाल्याचे कळताच तिने कालवा सुरु केला.

कानाडोळा करणे - लक्ष न देणे.
वाक्य - आईकडे मी भावाची तक्रार करत होतो, पण आईने माझ्याकडे कानाडोळा केला.

कासावीस होणे - व्याकूळ होणे.
वाक्य - उन्हात फिरून तहानेने समीरचा जीव कासावीस झाला.

कानउघडणी करणे - चुकीची जाणीव कडक शब्दात करून देणे.
वाक्य - रोज गृहपाट न करण्याच्या राजूच्या सवयीमुळे सरांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली.

कोप-यापासून हात जोडणे - संबंध न यावा अशी इच्छा करणे.
वाक्य - रामदासाचे शेजाऱ्याशी भांडण झाल्यामुळे, त्याने शेजाऱ्यांना कोपऱ्यापासून हात जोडले.

कौतुक करणे - तारीफ करणे.
वाक्य - परीक्षेत प्रथम अंक मिळवल्यामुळे सर्वजण अमितचे कौतुक करत आहेत.

कंठ दाटून येणे - गहिवरून येणे, दुःखाचा आवेग येणे.
वाक्य - स्वर्गवासी झालेल्या बाबांची आठवण येताच रेणूचा कंठ दाटून आला.

कंबर कसणे (कंबर बांधणे) - हिंमत दाखविणे, तयार होणे.
वाक्य - नोकरी सोडून नवीन उद्योग सुरु करण्यासाठी रतीने कंबर कसली.

" ख " पासून सुरु होणारे वाक्प्रचार 

खल करणे  -  चर्चा करणे.
वाक्य  -  पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्याबद्दल पंचायत समितीमधील सदस्य गंभीर खल करत आहेत.

खडे फोडणे -  दोष देणे.
वाक्य  -  रजतकडून अंगठी हरवल्यामुळे सर्वजण त्याच्यावर खडी फोडत आहेत.

खपणे  -  कष्ट करणे.
वाक्य  -  चांगले पीक काढण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात खपतात.

खसखस पिकणे  -  मोठयाने हसणे.
वाक्य  -  सरांनी चुटकुला सांगताच सर्व विद्यार्थ्यांमध्ये खसखस पिकली.

खळखळ करणे  -  नाखुशीने सतत नकार देणे, टाळाटाळ करणे.
वाक्य  -  ताटात कारल्याची भाजी वाढली की, रमा आईपाशी खळखळ करते.

खनपटीला बसने  -  पिच्छा पुरवणे.
वाक्य  -  आईने दिलेला अभ्यास पूर्ण करण्याचे अनूने खनपटीला बसवले.

खडकातून पाणी काढणे  -  अशक्य गोष्ट साध्य करणे.
वाक्य  -  नापीक जमिनीत लागवड करून माधवने जणू खडकातून पाणी काढले.

खडानखडा माहिती असणे  -  बारीकसारीक माहिती असणे.
वाक्य  -  आमच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या कामाची खडानखडा माहिती आहे.

खाली मान घालणे  -  शरम वाटणे.
वाक्य  -  चूक समजल्यामुळे रेणूने खाली मान घातली.

खिळून राहणे  -  जागच्या जागी स्थिर होणे.
वाक्य  -  समोर साप पाहताच अजय खिळून राहिला.

खुशीत मान डोलवणे  -  आनंदाने होकार देणे.
वाक्य  -  खेळणे हवे का, असे विचारताच छोटयाश्या राहुलने खुशीत मान डोलावली.

खुसपट निघणे  -  काहीतरी दोष निघणे. 
वाक्य  -  परेशने  कोणताही व्यवसाय सुरु केला, तरी त्यात काही ना काही खुसपट निघतच होती.
 
खुशामत करणे  -  स्तुती करणे.
वाक्य  -  मित्रांसोबत सहलीस जाण्याची परवानगी मिळावी, म्हणून रवी आईची खुशामत करत होता.

खूणगाठ बांधणे  -  निश्चय करणे. 
वाक्य  -  न चुकता, रोज कसरत करण्याची सोहमने मनाशी खूणगाठ बांधली.

खेद वाटणे  -  वाईट वाटणे.
वाक्य  -  आईने सांगितलेले काम करण्याचे विसरल्यामुळे, जीवनला खेद वाटला.

खेटून उभे राहणे  -  जवळ बिलगून उभे राहणे.
वाक्य  -  लहानगी सारिका आपल्या आईला अगदी खेटून उभी होती.

खोडा घालणे  -  संकट निर्माण करणे, विघ्न आणणे.
वाक्य  -  गावात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पाला काही माणसांनी खोडा घातला.

खोडी उलटणे  -  आपण केलेली खोडी अंगाशी येणे.
वाक्य  -  समीर धीरजची मस्करी करायला गेला, पण त्याची त्याच्यावरच खोडी उलटली.

खोऱ्याने पैसा ओढणे  -  खूप पैसा मिळवणे.
वाक्य  -  दिवसरात्र अभ्यास करून डॉक्टर झालेला चिन्मय आज खोऱ्याने पैसा ओढत आहे.

ख्याती मिळवणे  -  प्रसिद्ध होणे, नाम कमावणे.
वाक्य  -  मदर तेरेसा यांनी गरिबांची सेवा करून ख्याती मिळवली.

खंत करणे  -  काळजी करणे, चिंता करणे.
वाक्य  -  बाहेरगावी शिकायला गेलेल्या समीरची आई खंत करते.

खंड न पडणे  -  एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.
वाक्य  -  नित्यनियमाने देवपूजा करण्यात आईचा कधीही खंड पडला नाही.

खंत न करणे  -  काळजी न करणे.
वाक्य  -  खूप संकटे वाटयाला आली, तरी किशोररावांनी कधी खंत बाळगली नाही.

खांदे पडणे  -  निराश होणे, दीनवाणे होणे.
वाक्य  -  अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे वंदनाचे खांदे पडले.
 

Browse topics on Marathi Grammar

time: 0.0305550098