सर्वनामाचे प्रकार(Types Of Pronoun)


सर्वनामाचे प्रकार :-

सर्वप्रथम आपण पाहू सर्वनाम म्हणजे काय?
एखाद्या नामाचा उल्लेख वारंवार होऊ नये; म्हणून त्या नामाऐवजी मी, तू, तो, ते, आम्ही, तुम्ही, हा, जो, कोण, काय, स्वतः, आपण ही सर्वनामे वापरली जातात.

सर्वनामाचे एकूण ६ प्रकार आहेत :

१) पुरुषवाचक सर्वनाम 
 अ) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
 ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
 क)  तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

२) दर्शक सर्वनाम 

३) संबंधी सर्वनाम

४) प्रश्नार्थक सर्वनाम 

५) सामान्य / अनिश्चित सर्वनाम

६) आत्मवाचक / स्वतःवाचक सर्वनाम 


१) पुरुषवाचक सर्वनाम :-
बोलणारा स्वतःसाठी, समोरच्या व्यक्तीसाठी व दोन व्यक्ती तिसऱ्याबद्दल बोलतांना जी सर्वनामे वापरतात त्यास पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.

पुरुषवाचक सर्वनामे ३ प्रकारची आहेत :

अ) प्रथम पुरुषवाचक :-
बोलणारा स्वतःसाठी किंवा इतरांच्या वतीने स्वतःचा उल्लेख करतांना जे सर्वनाम वापरतो, त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. 
" मी, आम्ही, आपण, स्वतः " ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत.

उदाहरणार्थ :
१)  मी बागेत जातो. ( एकवचन )
२) आपण सहलीला जाऊ. ( अनेकवचन )
३) आम्ही सहलीला जातो. ( अनेकवचन )

या वाक्यात बोलणारा स्वतःविषयी बोलत आहे.

ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम :-
ज्याच्याशी बोलायचे ( दुसऱ्या व्यक्तीशी ) त्यासाठी जी सर्वनामे वापरतात त्यास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
"तू, तुम्ही, आपण, स्वतः " ही  द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत.

उदाहरणार्थ :
१) तू बागेत जातोस. ( एकवचन )
२) तुम्ही एवढे काम करा. ( अनेकवचन )
३) आपण आमच्याकडे कधी येणार?

या वाक्यांत बोलणारा दुसऱ्यांविषयी बोलत आहे.

क) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :-
बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो, त्याला  तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
" तो, ती, ते, त्या " ही तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत.

उदाहरणार्थ :-

१) तो बागेत जातो. ती बागेत जाते.
२) ते बागेत जातात. त्या बागेत जातात.

या वाक्यांत बोलणारा तिसऱ्याविषयी बोलत आहे.

२) दर्शक सर्वनाम :-

ज्या सर्वनामाचा वापर जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखविण्यासाठी केला जातो त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात.
" हा, ही, हे, तो, ती, ते " ही दर्शक सर्वनामे आहेत.

जवळची वस्तू दर्शवण्यासाठी - हा, ही, हे
दूरची  वस्तू दर्शवण्यासाठी - तो, ती, ते
 
उदाहरणार्थ :

१) हा माझा भाऊ आहे.
२) तो जुना वाडा आहे.
३) हे माझे पुस्तक आहे.
४) ती त्याची बहीण आहे.

दर्शक सर्वनामानंतर नाम येते.

३) संबंधी सर्वनाम :-
वाक्यातील दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या ' जो ' हा सर्वनाम येतो त्याला ' संबंधी सर्वनाम ' म्हणतात.

' जो ' हा मूळ संबंधी सर्वनाम असून ज्याने, ज्याला, जिचा, ज्याचा ही ' जो ' ची रूपे यांनाही संबंधी सर्वनाम म्हणतात.
जो---तो, जी---ती, ज्याचा----त्याचा अश्या जोड्यामध्ये येते.

उदाहरणार्थ :-
१) जो परिश्रम करतो तो यशस्वी होतो.
२) जी अभ्यास  करील ती पास होईल.
३) जे चकाकते ते सोने नसते.
' जो, जी, जे ' या सर्वनामांचा संबंध ' तो, ती, ते ' या दर्शक सर्वनामांशी दाखवला आहे.

४) प्रश्नार्थक सर्वनाम 
ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यास 'प्रश्नार्थक सर्वनाम' म्हणतात.
उदा. कोण, काय, कोणाला, कोणी, कोणता इ.

उदाहरणार्थ :-

१. त्या कपाटात काई आहे?
२. तुला काई पाहिजे?
३. तुम्हाला कोणी बोलावले?
४. तिकडे कोण बोलतो?

५) सामान्य / अनिश्चित सर्वनाम
कोण व काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत तसेच ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे स्पष्टपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना 'अनिश्चित सर्वनाम' असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

१. कोणी यावे कोणी जावे.
२. त्या पिशवीत काय आहे ते सांगा.
३. तुम्ही काय म्हणाल ते खरे.
४. कोणी कोणास हसू नये.

कोण व काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी आल्यास प्रश्नार्थक व प्रश्नासाठी न आल्यास सामान्य सर्वनाम मानावे.

६) आत्मवाचक / स्वतःवाचक सर्वनाम
'स्वतः' हा मूळ आत्मवाचक सर्वनाम आहे व 'आपण' ही सर्वनाम जेव्हा 'स्वतः' या अर्थाने येते तेव्हा 'आत्मवाचक सर्वनाम' असते.
आत्मवाचक सर्वनाम एकटे वाक्यात येत नाही तर नाम/सर्वनामासोबतच येतात.

उदाहरणार्थ :-

१. मी स्वतः तिला पहिले.
२. तू स्वतः अभ्यास करशील का?
३. ते आपण होऊन माझ्याकडे आली.
४. तुम्ही आपणहोऊन माघार घेऊ नका.

अपवाद : स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

Browse topics on Marathi Grammar

time: 0.0222620964